सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

रायगड,दि.05(जिमाका) :- महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. महाड औद्योगिक क्षेत्र येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश बानापुरे,एमआयडीसी चे अभियंता उदय देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाड औद्योगिक क्षेत्रातील नांगलवाडी फाटा ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत-9201.07 लक्ष)शिव मंदिर ते ग.द.आंबेकर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे. (कामाची किंमत-234.85 लक्ष) नांगलवाडी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट काँक्रिट रस्ता व बाजूच्या गटारीचे बांधकाम करणे, (कामाची किंमत-560.44 लक्ष) तसेच रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापुरी पध्दतीच्या बंधा-याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत- 753.62 लक्ष) या कामांचे भूमिपुजन यावेळी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, महाड विधान सभा मतदार संघाच्या विकासासाठी आ.भरत गोगावले अतिशय प्रयत्नशील आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागाकडून विकास कामासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून घेतला आहे. महाड मधील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच विकास कामासाठी पुरेसा निधी देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांनी, बचतगट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी केले. महाड औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील 94 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांची कामे उत्कृष्ट आणी दर्जेदार करण्याचे निर्देश श्री.सामंत यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. आपले शासन हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जलद गतीने कामे मार्गी लावण्यात येत असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.भरत गोगावले यांनी महाड एमआयडीसीच्या नवीन सांडपाणी वाहिनीचे काम जलदगतीने व्हावे तसेच नगर पालिकेची पाणीपट्टी माफ करावी तसेच विविध विकासकामे व्हावीत यासाठी मागणी केली. पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाड नगरपालिकेस अग्निशमन वाहनाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. 00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक