अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात घट

 

 

रायगड,दि.22(जिमाका): अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वनविभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदाच्या वर्षात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. विभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामुळे याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी दिली.

          अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौ.कि.मी. इतके आहे. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या मागील वर्षभरात अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण 155 वणव्यांच्या घटना घडल्या असून 286.984 हेक्टर वनजमिनीचे नुकसान झाले आहे. आग मुख्यतः ग्राउंड फायर स्वरुपातील असल्यामुळे जंगल नष्ट होत नसून जैवविविधतेला धोका पोहचत नाही तसेच जंगलातील आगीमुळे वनस्पतीचे व काजू बागायतींचे नुकसान निदर्शनास आलेले नाही.

     अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्गराज्य महामार्गजिल्हा मार्ग असे विविध रस्ते आहेत. वनकर्मचारी वणवा लागल्याचे निदर्शनास येताच तो तात्काळ विझविण्याकामी त्वरीत पोहचून वणवा आटोक्यात आणतात व त्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन तातडीने कारवाई केली जाते.

          अलिबाग विभागात वन वणवे लागू नयेत याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना: अलिबाग वन विभागात कुरणांचे क्षेत्र नाही. ज्या ठिकाणी गवत वाढते अशा क्षेत्रामध्ये जाळरेषा घेण्यात येऊन वणव्यास प्रतिबंध करण्यात येते. त्याचप्रमाणे विभागात फायर वॉच टॉवर्स देखील उभारण्यात आले असून फायर वॉचर्सची नेमणूक करण्यात येते. संयुक्त वन समित्यांच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दूरध्वनीवरून प्राप्त झालेले संदेश संबधीत वनक्षेत्रपाल यांना तात्काळ लेखी व दूरध्वनीद्वारे कळवून पुढील कार्यवाहीसाठी सुचना देण्यात येतात.

            त्रिपक्षीय करारांतर्गत खाजगी संस्थेच्या सहकार्याने पावसाळ्यात रोपांची लागवड करण्यात येते. यामध्ये वनविभागअशासकीय संस्थाआर्थिक अनुदान उपलब्ध करुन देणारी खासगी संस्था सात वर्षांकरिता वनजमीन लागवडीकरिता करार पध्दतीने दिली जाते व सात वर्षांनंतर लागवड केलेल्या क्षेत्रासह वनजमनीचा ताबा वनविभागाकडून घेण्यात येतो. जंगलामध्ये वणवा जाणूनबुजून पेटविल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय वननियम, 1927  प्रमाणे कार्यवाही करण्यात येईलअसे अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी सांगितले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक