मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी -- जिल्हाधिकारी किशन जावळे

 


 

रायगड(जिमाका)दि.5:- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार  उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या  प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी  श्री.जावळे यांनी सांगितले.

आदिवासी क्षेत्रासाठी विशेष मोहीम

रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी दिले.

निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक