मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विधानसभा निहाय प्रशिक्षण संपन्न



 

रायगड (जिमाका) दि.8:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत 32-रायगड लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी  मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज होत असून  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधानसभा निहाय प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मतदानाच्या दिवशी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध मुद्यांबाबत अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडीयार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येत आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

या विविधस्तरावरील प्रशिक्षण सत्र काळात जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

निवडणूकीच्या काळात प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची महत्वाची भूमिका असते. प्रत्येकाने मतदानाचे दिवशी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे असे मार्गदर्शन  जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

यावेळी प्रशिक्षणार्थीना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या शंकांचे श्रीमती पडियार यांनी यावेळी निरसन केले.

लोकसभा मतदार संघातील विधानसभानिहाय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली व गुहागर येथे झालेल्या प्रशिक्षण प्रसंगी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक