फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

 

 

रायगड(जिमाका)दि.25:- भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर/मुंबई पदवीधर/मुंबई शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.24 मे 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दि. 26 जून 2024 रोजी रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण या पोलीस ठाणेच्या हद्दीत मतदान होणार असून दि.01 जुलै 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे याकरीता कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण या पोलीस ठाणेच्या हद्दीत 08 मतदान केंद्र (इमारत) च्या ठिकाणी असलेल्या एकूण 47 बुथवर पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई प्रशांत मोहिते यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये खालील कृत्यास मनाई आदेश जारी केला आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवून जाण्यास मनाई आहे (निवडणूकीशी संबधित कामाकरीता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी वगळून).  मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात लाउडस्पीकर/मेगाफोन वापरणे, आरडाओरडा करणे, गोंधळ घालणे, दुर्वर्तन करणे इत्यादी कृती करण्यास मनाई आहे.  मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र घेवून जाण्यास मनाई आहे (अपवाद- मतदान केंद्राच्या सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी, ज्या व्यक्तीस SPG/Z+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे अशा व्यक्तीस साध्या वेशात एक सुरक्षा रक्षक शस्त्र लपवलेल्या स्थितीत घेवून जाता येईल).  मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे. मतदारांना देण्यात येणारी चिट्ठी पांढ-या कागदावर असावी. त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षाचे नाव नसावे. मतदान केंद्राच्या परिसरात पक्षांचे कार्यकर्त्यांचे निवासस्थाने असल्यास त्याठीकाणी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदानाकरिता जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहन आणण्यास मनाई आहे (अपवाद- अपंग/वृध्द/आजारी मतदारांना घेवुन येणारी वाहने).मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसराचे आत राजकीय पक्षांचे/उमेदवारांचे निवडणूक बुथ लावण्यास मनाई आहे.

 मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर निवडणूक बुथ लावताना पुढील अटींचे पालन करावे- बुथ लावण्याकरीता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी व बुथ लावण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना आगावू माहीती द्यावी. प्रत्येक बुथवर कमाल एक टेबल, दोन खुर्चा असाव्यात. बुथ करीता लावलेल्या मंडपाचा आकार 10X10 फुट पेक्षा जास्त नसावा.

हा आदेश कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रामध्ये दि. 26 जून 2024 रोजी 00.01 वा. पासून ते दि. 26 जून 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड