रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न

 

रायगड जिमाका दि.3:- रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या दि.04 जून रोजी स.8 वाजेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा मतमोजणी निरीक्षक कमलेश कुमार अवस्थी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता.

नेहुली येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांसह विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण 1 हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणीची रंगीत तालीम संपन्न

आज नेहुली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी यांनी घ्यावयाची दक्षता, कामाकाजाचा प्रोटोकॉल यांसह सर्व आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आणि सराव यावेळी करण्यात आला. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्वजण अतिशय प्रामाणिक पणे कार्यरत आहात. एकूणच जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व कार्यवाही करावी असे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी सांगितले. तसेच सर्वाना शुभेच्छा दिल्या.

मोबाईल नेण्यास मनाई

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड