नवीन ई-पॉस मशीन्स मुळे धान्य वितरणात येणार अधिक सुलभता आणि पारदर्शकता


 

रायगड,दि.09(जिमाका):- महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व 1 हजार 442 रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह  उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची (Thumb Authentication) गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन 2017 मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत.

या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ekyc करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण (Aadhar Seeding), ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड