जिल्ह्यात घरोघरी तिरंगा’ अभियान राबविणार-- जिल्हाधिकारी किशन जावळे 12 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज सन्मान दिवसाचे आयोजन
रायगड (जिमाका) दि.7 :- महाराष्ट्र राज्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे केले जाणार आहे. रायगड जिल्ह्यात या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आणि दि.12 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज सन्मान दिवस आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
घरोघरी तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी श्री.जावळे बोलत होते.
केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा ) अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षीही जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम दि.9 ऑगस्ट रोजी स. 9 वा तिरंगा यात्रा, दि. 10 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली, दि. 11 ऑगस्ट रोजी तिरंगा मॅरेथॉन, दि 12 ऑगस्ट रोजी विविध देशभक्ती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच तिरंगा सन्मान दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या तिरंगा ध्वजाची देखभाल, दुरुस्ती करून 13 ऑगस्ट रोजी घरावर लावण्या सज्ज करून ठेवायचा आहे. दि.13 ते दि.15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे
प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा ध्वज दि.13 ते दि.15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाने हे अभियान रायगड जिल्ह्यात यशस्वी करावयाचे आहे,यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री.जावळे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment