आयुष्मान भारत कार्ड योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजाणी करावी --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड (जिमाका) दि.9 :-जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आयुष्मान भारत कार्ड ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आयुष्मान भारत कार्ड योजनेसंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड योजना मिशन समिती प्रमुख ओमप्रकाश शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती कुचिक, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग पेण श्रीमती शशिकला अहिरराव,जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे. या योजनेचा शासन निर्णय दि.28 जुलै 2023 रोजी निर्गमित झाला परंतु प्रत्यक्ष कार्यवाही दि.1 जुलै 2024 पासून सुरु झाली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात या योजनेच्या मोफत कार्ड वाटपाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील रेशनधारक दुकानधारक व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्टॉल लावून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देता येईल ते पहावे. विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपले आयुष्मान भारत कार्ड तयार करुन घ्यावे.
आयुष्मान भारत कार्ड योजना मिशन समिती प्रमुख ओमप्रकाश शेट्टी यांनीही यावेळी आयुष्मान भारत कार्ड योजनेविषयीची सविस्तर माहिती देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
०००००००
Comments
Post a Comment