गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस शासकीय खरेदी सुलभ करणारी यंत्रणा--जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड (जिमाका)दि.7 :- रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलचा उपयोग करावा. या माध्यमातून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील आणि सर्व कामांना गती मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, रायगड यांच्यातर्फे आज शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक अमिता पवार, पोर्टल समन्वयक शैलेश जाधव यांसह शासकीय, निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने व्यवसायसुलभतेचा अवलंब केला आहे, त्यामुळे उद्योग-व्यवसायातील प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस हा त्याचाच एक भाग असून पूर्वीच्या तुलनेत सध्याची ही खरेदी प्रक्रिया लवचिक, पारदर्शी बनली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी. ज्यांनी अद्याप जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्या कार्यालयांनी तात्काळ नोंदणी करावी असेही श्री.जावळे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बास्टेवाड यांनी जास्तीत जास्त शासकीय कर्यालयानी या पोर्टलसाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी असे निर्देश दिले.
यावेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेविषयी उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेस विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००००
Comments
Post a Comment