मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

 

रायगड (जिमाका),दि.9:- राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgarmahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबीरातही नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील रिक्त जागेकरीता योजनेंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी महास्वयंम संकेतस्थळावर 'सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम' अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरीता ऑनलाईन अर्ज करावे.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. तो 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलाअसावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असावे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना 8 हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने रिक्तपदे नोंदविलेली आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वस्तू व सेवा कर विभाग, सह-आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, उपक्रमांसह बीव्हीजी इंडिया लि., एस. के. कॉर्पोरेशन अशा अनेक खाजगी आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयास  संपर्क साधावा, असे आवाहन श्री.जावळे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक