कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

 

रायगड दि. 23 (जिमाका) : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

        जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषि अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिति स्थापन करण्यात आली असून समिती  खते, बियाणे व किटकनाशकांच्या प्राप्त तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करेल. खरीप हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यातील 56010 हे क्षेत्रासाठी एकूण 5191 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. तसेच खतांचे एकूण 12907 मे. टन एवढे मंजूर आवंटण आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये पालकमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे वितरण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषि विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सद्य परिस्थितीत जिल्हयात बियाणे व खते पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतक-यांनी कृषि सेवा केंद्रांमधून आवश्यक कृषि निविष्ठांची खरेदी करुन ठेवावी. तसेच बियाणे, खते व किटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे व निविष्ठा वापर करतांना सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करावे.  निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे कृषि विभागाकडून शेतक-यांना आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यानां कृषि सेवा केंद्रामध्ये तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक, भावफलक, साठा फलक, परवाना, तसेच " सदर कृषि सेवा केंद्रामध्ये लिंकिंग केले जात नाही " अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री महोदयांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कृषि सेवा केंद्र चालकांकडून नियमांचे आणि दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कृषि विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज