माझे वन" नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ

 

 

रायगड(जिमाका)दि.21:- अलिबाग वन विभागातील अवनत वन क्षेत्राचे शासकीय निधीचा वापर न करता वनीकरण करण्यासाठी अलिबाग वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून माझे वन ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ वनमंत्री श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते मौजे जुमापट्टी, ता. कर्जत (माथेरान परिक्षेत्र) येथील राखीव वन कक्ष क्र. 50 अ येथे 1 एकर अवनत क्षेत्रावर वृक्ष रोपण करुन आज दि. 22 मे रोजी करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांना वाटणारे वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन करण्याचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर सन 2025 चे पावसाळयात वनीकरण होणार आहे

"माझे वन" योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार असल्याने, अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत होणार आहे. वन कर्मचारी यांनी निवड केलेले अवनत 1 एकर क्षेत्रास त्यांचे स्वेच्छेने नाव देण्याची त्यांना मुभा राहणार आहे.

अलिबाग (प्रा.) वन विभागात 1 उप वनसंरक्षक, 2 सहाय्यक वनसंरक्षक, 12 वन परिक्षेत्र अधिकारी, 74 परिमंडळ अधिकारी आणि 249 नियत क्षेत्र अधिकारी अशी एकुण 338 क्षेत्रीय पदे कार्यरत आहेत.

अलिबाग वन विभागांचे कार्यक्षेत्रात अलिबाग, वडखळ, पेण, पनवेल, उरण, खालापुर, कर्जत पुर्व, कर्जत पश्चिम, माथेरान, सुधागड व नागोठणे अशी 11 परिक्षेत्र असून एकूण 1065.61 चौ.कि.मी. एवढे वनक्षेत्र आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज