आत्मविश्वासाने उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करा, जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर --जिल्हाधिकारी किशन जावळे



रायगड (जिमाका) दि.23:-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षीत युवक-युवतींना व्यवसाय उभारणीसाठी  प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. शासनाने या योजनेत अमूलाग्र बदल केला असून कोकणातील स्थानिक बाबींचा यामध्ये समावेश केला आहॆ. तरी जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक बनावे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांनी सर्वोतोपरी सहाय्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, उद्योजक लक्ष्मण जाधव यांसह जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्ह्यात उद्योगधंदे उभारणी झाली तरच रोजगार निर्मिती होईल हे लक्षात घेऊन  या कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत युवक-युवतींना कर्ज उपलब्ध करुन त्यांना व्यवसाय उभारणीसाठी प्राधान्याने कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशित केले. तसेच सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकाने प्राधान्याने जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे. नव उद्योजकांनी उद्योग उभारल्यास त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊन आर्थिक उन्नती साध्य करता येईल. या उद्योजकांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता आहे असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले ही अतिशय भूषणावह बाब आहे. यंदाच्या वर्षात जिल्हा प्रशासन 200 टक्के उद्दिष्ट पूर्ण करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. लाभार्थ्यांने आपला उद्योग व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या अडचणी, समस्या जिल्हा प्रशासनास अवगत केल्यास जरुर आम्ही आपल्याला मदत करणार असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सर्व लाभार्थ्यांना दिले. तसेच सर्व नवउद्योजकांना आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करुन त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

जिल्हा महाव्यवस्थापक श्री.हरळय्या यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत आता  दुहेरी फायदा आणि मोठ्या संधी मिळणार असल्याचे सांगितले. उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु.1 कोटी  आणि सेवा व कृषी पूरक व्यवसायांसाठी रु.50 लाख पर्यंत कर्ज मिळवण्याची संधी आहॆ.  सेवा उद्योगांसाठी आता प्रकल्प खर्चाच्या 60%  आणि उत्पादन उद्योगांसाठी 40%  पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध होणार आहॆ. Tasech कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल/ढाबा (शाकाहारी/मांसाहारी), होम-स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय आता योजनेतंर्गत पात्र असणार आहे.  10 लाखांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी आणि 5 लाखांवरील सेवा व कृषी पूरक व्यवसायांसाठी आता फक्त 8 वी पास असणे आवश्यक असून18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही स्थानिक रहिवाशाला या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा महाव्यवस्थापक श्री.हरळय्या यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करुन भविष्यात अडचणी आल्यास जिल्हा उद्योग केंद्र येथे भेट द्यावी, असे सांगून मेळाव्याची सांगता करण्यात आली.

सीएमईजीपी च्या लाभार्थी नवउद्योजकांना रायगडचे उद्योजन लक्ष्मण जाधव यांनी मार्गदर्शन केले.उद्योग सुरु करताना निर्णय क्षमता, नवतंत्रज्ञान, उत्पादन गुणवत्ता व महत्वाचे बिझनेस इथिक पाळण्याचे अत्यंत आवश्यकता आहे. तसेच नवउद्योजक सतत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी विद्यार्थी म्हणून ज्ञान आत्मसात करुन आपल्या व्यवसायात कालानुरुप बदल करावे असे श्री.जाधव यांनी सांगितले. 

०००००

        

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज