'निराधार बालकांना मिळणार आधार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार"
रायगड(जिमाका)दि.20:- समाजामध्ये असंख्य अशी निराधार बालके आहेत. अशा बालकांना कागदोपत्री कोणतीही तरतुद नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. असे उपलब्ध माहितीतून दिसून आले आहे. त्याचाच गांभिर्याने विचार करून निराधार बालकांना नैसर्गिक त्यांचे अधिकार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्या तर्फे निराधार व भटक्या जमातीच्या बालकांच्या हक्कांना आधार देण्याकरिता "साथी समिती गठित करण्यात आली आहे.
साथी समितीचा मुळ उद्देश निराधार बालकांच्या हक्कांना आधार देणे म्हणजेच समाजामध्ये जी निराधार बालके आहेत, ज्या बालकांना कोणताही आधार नाही, कागदोपत्री देखील कोणता पुरावा नाही, अशा बालकांना साथी समितीतर्फे २७जून ते ५ ऑगस्ट या कालावधी मध्ये मोहिम राबविली जाणार आहे. सदरील समिती निराधार बालकांचा सर्व्हे करून त्या बालकांना आवश्यक व महत्त्वाचे असणारे आधारकार्ड काढून देणार आहे. त्यामुळे बालकांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच त्यांच्या अन्य वैयक्तिक ओळखीकरीता मोलाची मदत होणार आहे.
या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व साथी समितीच्या अध्यक्षा श्रीमती तेजस्विनी निराळे यांच्या नेतृत्वा खाली ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे.
समितीमध्ये विधी सेवायंत्रणा, स्थानिक प्रशासन सर्व तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस, आरोग्य, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था बालकल्याण समिती विधीज्ञ, विधी स्वयंसेवक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, पोलीस अधिकारी संबंधित सर्व NGO शासकिय व अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून सर्व शासकिय स्थरावर एकत्रित बालकांसाठी काम करून निराधार बालकांना न्याय देण्याचे कार्य राबविले जाणार आहे.
याकरिता आपल्याला माहित असलेल्या निराधार बालकांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग या कार्यालयाकडे पाठविण्यात यावी व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व साथी समितीच्या अध्यक्षा श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment