आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न एकाग्रता जपण्यासाठी प्रत्येक माणसाने योग करणे अत्यंत महत्वाचे --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड(जिमाका),दि.21 :- प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एकाग्रता जपण्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, राहुल कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मेरा युवा भारतचे अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम. तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सुचिता ठमाळे, आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक विरेंद्र पवार या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला. अप्राप्त वस्तू प्राप्त होणे याला योग म्हणतात. प्राणायाम ध्यान आसने यातून मानसिक एकाग्रता वाढते. यातून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य होते. नेमून दिलेले कर्म विहित वेळेत,सातत्याने केले तर आपण चांगल्या विश्वाची निर्मिती करू शकतो. एकाग्रता मिळवण्यासाठी योग केले पाहिजे आणि योगात सातत्य आवश्यक आहे आणि आयुष्यात शिस्तीची गरज आहे. शिस्त योगाद्वारे लागते,आरोग्य सुधारते. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा, व्यायामांचा समावेश करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
योग शिक्षिका माधवी पवार यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.
००००००
Comments
Post a Comment