माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक-- महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे
रायगड (जिमाका) दि. 21:- भारताने जगाला दिलेले योगसाधनेचे अमूल्य ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात रुजावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत माणगाव तालुका प्रशासन, तालुका क्रीडा अधिकारी व मनोयोग मंदिर, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे यांनी सहभाग घेत योगसाधना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मंत्री कु.अदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या शरीराला व मनाला अंतर्बाह्य निर्मळ करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे ‘योग’. नियमित योगसाधना केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो, मनास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक बनतो. उपस्थितांनी एकत्रितपणे विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली व योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
यावेळी माणगाव तालुक्यातील अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment